प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
संन्यास 
श्रीधरा सुटत नाही घर 
घेणार कसा तू संन्यास ?
जीवांत पाय गुंतलेला 
शिवात धुमसता श्वास 
मोहाची रक्तात दारू 
व्यसनांचे मेंदूत वारूळ 
चंगळीचे शिल्प मज्जेत 
 असण्याची प्रभा मचूळ 
घर शेवटचा मोह 
कळते पण वळत नाही 
आवश्यक पाठ करणे 
पण पाय हलत नाही 
भ्रमान्कीत जीवनशीण 
थकव्यांचा पेशीत थवा 
हे घरही हवे आणि 
संन्यासही तुला हवा 
प्रपंच बाभूळघोर 
कर्तव्यकाटे  उमलते 
जे अस्तित्वात नाहीत 
पण दिसतात आत फुलते 
शोध असा तू संन्यास 
खांद्यावर घर टाकेल 
ज्याचा कणा न मेंदू 
शिवसाधनेत वाकेल 
कर क्षमा महादेवा 
शोधतोय मार्ग मधला 
ऐकून आहे साधकास 
तू सुवर्णमध्यात भेटला
खांद्यावरती घरकुल 
पाठीवरती संन्यास 
साधत मध्य श्रीधर 
निघाला खोल अनंतात  
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
 
No comments:
Post a Comment