प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१३ पंढरपूर २
विठ्ठला तू शैव होतास डोक्यावरती  शिवलिंग 
हे स्पष्ट पहावयास लागते ना डोळ्यास भिंग 
आसपास सर्वत्र तुझ्या शिवमंदिरेच मला दिसतायत  
उघड्या डोळ्यांनी तुझी खरी ओळखही ती सांगतायत 
तरी बडव्यांच्या कैदेमध्ये पाहून तुला जीव व्याकुळ 
तुझ्या दारी ब्राह्मण्याची रोज भरतात वैदिक चूळ 
अस्पृश्यांना प्रवेश नव्हता तू मग होतास कसला देव 
चोखामेळा मेला तरी बडव्यांचा कायम चेव 
वेद तीन वर्णासाठी आगम सर्वांसाठी खुले 
तरी वैदिकांच्या नादी रंजलेले आणि गांजलेले  
न वाचताच वेद संतांनी वेद जाणतोच्या घोषणा केल्या 
वेद म्हणजे दंतकथा न जाणताच पिढ्या मेल्या 
हर हरीला एकत्र जोडून शेवटी ह्यांनी साधले काय 
हर बहिष्कृत झाला हरीने दिला त्याच्यावर पाय 
समन्वयाच्या नावाखाली शैव केले समूळ नष्ट 
आमच्यासारखे वाचलेले अजूनही भोगतात कष्ट 
तुला पुन्हा शैव करावे हे आता अशक्य वाटते 
तुझे दास्यत्व बघून माझ्या डोक्यावरचे आभाळ फाटते 
कृष्णाचा अवतार केला खाली दिली वैष्णव वीट 
ज्ञानेश्वर नामदेव तुक्याने कपडे दिले मुक्तीचे फिट 
संतांच्यामुळे देव झालास खंडपतीचा हेही आक्रीत 
ह्या देशी काहीही होते तू ह्याचे उदाहरण विपरीत 
प्रश्न इतकाच डोक्यावरच्या शिवलिंगाचे करू मी काय
वीट देवून पाया काढून घेतला बंदिस्त केले पाय 
रहा ऊभा म्हंटलेच आहे अठ्ठावीस युगे आता निमूट 
पंढरपूरातून मी निघालो शिवलिंगाची घेवून चिमुट 
श्रीधर तिळवे नाईक
 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
 
No comments:
Post a Comment