Wednesday, September 2, 2015

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१ 
मी 
मी वैदिक  नाही
कारण मी वेदांना प्रमाण मानत नाही  

मी ब्राम्हण नाही
कारण मी स्मृती , ब्राह्मणणे आणि  वर्णव्यवस्था  प्रमाण मानत नाही

मी वैष्णव नाही
कारण मी पुराणे , महाकाव्ये , गीता , जातीव्यवस्था ,  विष्णूला प्रमाण मानत नाही

मी शैव आहे
जो थेट  हराप्पा  संस्कृतीपासून हर हर करत महादेवतोय

माझा मराठी संस्कृतीशी थेट पंगा आहे
कारण ती वेदाळलीये  , विष्णूळलीये  , रामाळलीये  , कृष्णाळलीये

माझे सख्य गौतम बुद्धाशी , वर्धमान महाविराशी आहे
आणि हे सांगताना माझा शब्दकणा ताठच आहे


तुम्ही म्हणता मी बाटलेला दलित आहे
मी म्हणतो मी नव्या युगाचा शैव संत आहे

तेव्हा हर हर महादेव हाच माझा चेव
आणि भवानी तलवार  हीच माझी बोली

तेव्हा माझी किती खोली
विचारू नका
माझी मुद्रा' समुद्र ' आहे

मी लाटाळतो  तेव्हा कविता होते
पिसाळतो तेव्हा क्रांती

तेव्हा पंगा घेताना जरा जपून
संन्यासी आहे , नामर्द नाही


२ 
वारसा  
नकुलिश वेगळा आणि लकुलीश वेगळा 
''न '' कुल  होते म्हणूनच नाव 'न'कुलिश नावाप्रमाणे आगळा 

माहित न्हवता पिता आणि माहित न्हवती माता 
अनाथ असूनही झाला नकुलिश जगाचा त्राता 

लिंगा पुढचा प्रसाद खाऊन झाली त्याची वाढ 
शैवागम  शिकला सारा शिवदर्शनात झाला गाढ 

शिवाचार पाळून त्याने निर्मळ मिळवला मोक्ष 
बसला जेव्हा निश्चयाने मी लाविन सोक्षमोक्ष 

मोक्ष म्हणजे महा अक्ष शंकराचा तिसरा डोळा 
प्रत्येक माणसात विलसतो भुवया मधोमध भोळा 

तोच दहावे दार आणि त्यानेच होते शिवभेट 
मेंदूचा अश्वत्थ  फुलतो वसंत उमलतो शरीरभर थेट 

नकुलीशांचे दोन शिष्य लकुलिश आणि पतंजली 
दोघेही होते आर्य वेदांची पकडून आले होते उंगली 

लकुलीशाने सुरु केली आगमाची ब्राह्मण शाखा 
पतंजलीने वैदिकासाठी सूत्रे लिहली उघडली प्रशाखा 

न'कुलिशांचा एक शिष्य कर्नाटकात जाऊन विसावला 
माझा एक पूर्वज त्याचा शिष्य म्हणून जवळ बसला 

त्याच्याकडून गोव्यात आले पाशुपत दर्शन निर्मल 
माझ्या  आजोबाने ते मला दिले संपूर्ण सकल 

वासुदेव नाईक नाव त्याचे तो माझा मातुल आजोबा 
त्याच्यामुळेच माझा झाला शिव दर्शनाशी घरोबा 

शिवाकडून रवळनाथ रवळनाथाकडून खूप काळाने नकुलिश
नकुलीशाकडून वासुदेव नाईक नाईकाकडून मीच 

परंपरा सांगणे आणि परंपरेत असणे ह्यात असतो फरक 
असणारा थेट सादर करतो सांगणारा असतो दर्शक 

मी थेट परंपरेत आहे म्हणूनच पाहू शकतो नवता 
परंपरा  न बनते भवरा न  खाते  माझ्यात  गोता 

लकुलीशाने पाशुपत  ब्राह्मणा करता  केला खु ला 
पण ब्राह्मणापुरता मर्यादित करून आगमाला लावला टाळा 

न'कुलिशाचा आगम मात्र सर्वांच्यासाठीच ओपन 
कुणीही यावे समजून घ्यावे मनमोकळेपणाने दर्शन 

गुरूचीच आज्ञा म्हणून नाईकांनी बांधले रवळनाथ मंदिर 
वैदिकांच्या नादी लागून जातीयतेचे लावले शिर 

वासुदेव नाईक जातिमुक्त लग्नही केले जातीबाहेर 
मुलींची लग्ने कठीण झाली तरी न सोडला शीवफेर 

त्याच्याच सांगण्यावरून मी मांडतो आहे शुद्ध शैवदर्शन 
इतिहास माझा सांगून झाला चला पकडा साधनेचा क्षण

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
३ आजोबांचा उपदेश
 आपण शैवाचार्य सर्व शैवांचे प्रमुख 
खुद्द शिवशक्तीचे जनेटिकल आमुख 

ज्यांनी शैव आगम टाकले ते झाले देशस्थ 
आपण आगम सोडला नाही आगमातच ह्रदयस्थ 

आपण अल्पसंख्यांक जवळ जवळ नाहीसे 
मात्र शैव आगमांचे आपल्याजवळ खजिने 

पुरोहित बनले कर्मकांडी आपण बनलो नाही 
आपले ज्ञान दस्तूरखुद्द शिवाची सही 

कित्येकदा ठोकरून लावली ब्राह्मण बनण्याची ऑफर 
वैदिकांनी stamp मारला हे गुरु म्हणजे लोफर 

आपण कधी सोडली नाही ज्ञानाची कास 
पाशवी कधी झालो नाही सोडवताना पाश 

इतर शैव आगम वैदिक ब्राह्मणांनी  बळकावले 
आपण मात्र आपले सत्व पेशीपेशीत पाळले 

जातपात वर्णपर्ण आपण नाही जुमानले 
कटले कित्येक पूर्वज पण डोके नाही वाकले 

विरशैवांना साथ दिली ब्राह्मणाळले सोडून दिली 
विष  बनली तेव्हाही कैवल्याची शिशी पिली 

दुर्देव कि कोणालाच बनायचे नाही गुरु 
गुरव बनण्यात गुंतलेला जो तो सुरु 

तू इथे बनू नकोस गुरव किंवा ब्राह्मण 
शिवोपासना नीट कर साजरा कर ज्ञानसण 

मागच्या जन्मी होतास तू हिमालयावर योगी 
ही तलवार खाली ठेव नको बनूस भोगी 

तूझा जन्म शैवागम नव्याने मांडण्या झाला 
सात चक्रे पार करण्या तू आमच्यात आला 

आजोबा म्हणून सांगणे होते माझे कर्तव्य 
स्वःतालाच प्रमाण मान तूच बाळग तारतम्य 

परोक्ष प्रत्यक्ष अनुमान आणि आगम प्रमाण मान 
मात्र शेवटी ज्याचे त्याचे धनुष्य आणि बाण 

इतके बोलून आजोबा खोलीतून झाले नाहीसे 
चार वर्षे शरीर माझे अकारण वेडेपिसे 

सत्यासत्य प्रश्न ओलांडून मी आता बाहेर 
शिव आत खोलवर आणि भोवती चौफेर 

मी निघालो !मी निघालो ! घेण्यासाठी संन्यास 
इथूनच माझा सुरु झाला अध्यात्माचा तास 

कहाणी माझी संपली सुरु करा आसन 
म्हणा मुखाने एक मुखाने अलख निरंजन !अलख निरंजन !

श्रीधर तिळवे -नाईक

(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )

No comments:

Post a Comment