प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१२ पन्ढरपूरात १
विठ्ठल वैष्णव शैव पांडुरंगदोघेही उभे घेवून एक अंग
पुंडलिकाच्या विटी उभा पांडुरंग
डोईवर त्याच्या भव्य शिवलिंग
विठू विष्णू झाला आकारात सामावला
पार्वतीचा आकार रुक्मिणी झाला
हर-हरी झाला अदभूत संगम
बडवे आले गायबले जंगम
आता नाही दिसत कुठेच हर
पार्वती गायब सर्व लक्ष्मिप्रहर
विटही झाली ब्राह्म्ण्यात फीट
चोखा मेला तरी जातीची शिट
जीभ जातिमुक्त काळीज जातीयुक्त
अजिबोगरीब भक्तांचे रक्त
राम कृष्ण हरी ! राम कृष्ण हरी !
मुक्ती मात्र नाही कुणाच्याच घरी
चला श्रीधर तिळवे उठवा तुमचे बूड
ह्यांच्या नादी लागून तुम्ही व्हाल आखूड
चालला चालला ! श्रीधर चालला !
शिवलिंगांचा सोबत काफिला
हर हर महादेव! हर हर महादेव !
तुकारामासोबत संपली माझी ठेव
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment