Monday, October 26, 2015

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभागश्रीधर तिळवे -नाईक
१५ पंढरपुरात ३ : श्रीकृष्णास 
उपमन्यूकडून घेतलास दीक्षा आणि झालास तू दैवी 
तुझ्याच नावाने निघावा का नवीन पंथ वैष्णवी 

शिवाचा भक्त जर का होतास का पाहिलीस जातपात 
कि नव्हते वाटले तुझ्या नावे होतील जात आघात 

अवतार होतास का तू जर सगळ्यांचाच अन भगवंत 
जात काढून महारथी कर्णाचा कसा करतोस अंत 

एकलव्य तर गुरुभ्रमात अंगठा काढून मरून गेला
का नाही बनवलेस कधी अर्जुनाप्रमाणे त्याला चेला 

वैश्य शूद्रांना पापयोनी अतिशुद्रांना केले दास 
पाशमुक्त करण्याऐवजी निर्माण केलेस समाजपाश 

कित्येक शैव मानतात कि गीता आहे  शैव ग्रंथ 
मला मात्र दिसतो वर्णभेद तिच्यात करताना रवंथ 

ब्राह्मण क्षत्रियांची दिसते मला फक्त त्यात भलावण
 टिकावे त्यांचे वर्चस्व म्हणून कि तुझे होते भगवंतपण 

जो भगवान माणूससुद्धा जातीदृष्टीतून पाहतो 
कसा काय त्याला जगात मानसन्मान आदर मिळतो ?

जा बाबा तुझेमाझे नाही एक मानवकुल 
तू तर आहेस चालतेबोलते वर्ण व्यवस्थेचे संकुल 

माझ्या मनात तुझ्याविषयी संशय आहे वारेमाप 
तुझ्यासारखा ईश्वर असेल तर ईश्वराचा नकोच ताप 

बस माझ्या आईच्या तू काळजीपुर्वक देव्ह्याऱ्यात 
माणुसकीचा मी भक्त आहे माझी भक्ती पुरी भरात 

स्वीकारावे तरी प्रॉब्लेम नाकारावे तरी प्रॉब्लेम 
तुझ्यावरती वाटत नाही करावासा आता क्लेम 

शेवटी आता जो तू आहेस तोच मानावा लागतो खरा 
ब्राह्मण्याला बळी पडलास माणूस म्हणून असशील बरा 

तुझी श्रीकृष्ण नीती घेवून सारे राजे चालवतात राज्य 
तू दह्याची चोरी केलीस ह्यांना काहीच नाही ताज्य 

तुला सोळा सहस्त्र नारी शिवाय राधा प्रेयसी विवाहित 
लग्नाबाहेरच्या संबंधाना मान्यता द्यायची कृष्णरीत 

खोटे नाही पण संदिग्ध बोलणे धूर्तपणा थोडे कपट 
सगळेच तुझे अनुयायी कोणी वेळाने कोणी झटपट 

कैवल्य प्राप्ती अशी असेल मिळत माझा विश्वास नाही 
तुझ्या नावे धर्म निघावा हा योगायोग पचत नाही 

तू कदाचित व्यासांचे काल्पनिक charactar  असशील 
माहित नसेल त्यांनाही तू सर्वांच्या डोक्यात बसशील 

असशील सत्य वा काल्पनिक  माझा नाहीस तू मार्गदर्शक 
मी प्रश्न विचारणारा भक्त आहे मला नाही कुणाचा वचक 

महाभारत कर वैष्णव बनव साधन बन वा बन भगवंत 
मी लोजीकली चालणारा आहे मी श्रद्धेचा नाही संत 

मी तुडवीत चाललो पुराणे माझ्यासमोर भगवान शिव 
माफ कर मला तुझ्यावरती जडला नाही माझा जीव 

ज्याचा त्याचा choice आहे ज्याचा त्याचा आहे उपाय 
शक्तीपासून डावा आणि शिवापासून उजवा पाय 

चाललो मी ओमं नमो शिवाय नम : नमवेल तम 
शिवामध्ये शिरतांना नाहीसे होतायत तुझे भ्रम 


श्रीधर तिळवे -नाईक


(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )


No comments:

Post a Comment