Friday, June 26, 2015

३९  नीघ / श्रीधर तिळवे 



तू ते देतोयस
जे ह्या संस्कृतीला पचत नाहीये

तू ते कपडे घालतोयस
जे वाळवायला ह्या संस्कृतीला अंगणच नाहीये

तू एक अशी कोल्हापुरी चप्पल आहेस
जी कोल्हापूरला पचली नाही

तू एक असा मुंबईकर गमबूट आहेस
ज्याने इथला पावसाळा पचवला
पण जो इथल्या पाण्याला पचलाच नाही

तू ह्या संस्कृतीचे असे अजीर्ण आहे
जे पोटातून फेकताही येत नाही
आणि पोटात ठेवताही येत नाही

अशा सर्वांनाच नकोश्या झालेल्या लोकांच्यात
तू च्युतीयासारखा काय करतोयस श्रीधर

संस्कृती ही समाजाने मारलेली शेवटची थाप आहे
तरी तुझी ह्या संस्कृतीत अशी तुझी दैना करणारी घूटमळ का

कि तुझ्या अंगातला हा शेवटचा मळ आहे ?

निघ बाबा
झाला तेवढा सिनेमा खूप झाला

चुकून सिनेमास्कोप दिसलास तर तुझ्या शरीराच थीअ टर फोडतील

नीघ !

श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या काव्य फायलीतून )

No comments:

Post a Comment