आत्ताच्या कविता /श्रीधर तिळवे- नाईक
दत्ता दादा गेला तेव्हा
१
तू काळजाचा प्लग काढून घेतलास
आणि विजेला शरीरात येण्याचे आमंत्रण दिलेस
२
दूरवर झालेला मृत्यू जवळ घेता येत नाही
हात गायब झालेत असं नाही
ते flat झालेत
इतके कि ते
मांसल होणे विसरलेत
३
तू मेलेला नाहीस
फक्त debodify झालायस
४
काही दिवसापूर्वी मी death हा शब्द गुगल केला
आणि कॉम्पुटर हेंग झाला
असे नाही कि मी थांबलो
फक्त मोबाईलवरून रवंथलो
आणि काही दिवसांनी कळाले
मी हेंग होतो
५
मी तुझ्या मृत्यूला विशेषणे देत नाहीये
किंबहुना मी आताशा
कविता विशेषणरहित लिहितो
मी विशेषणरहित जगू लागलो आहे कि काय ?
६
महामृत्यु झाला
स्वयंप्रकाश प्राप्त झाला
पण मी लोकात गेलो नाही
मृत असलेल्या लोकात
नुकत्याच जिवंत झालेल्या माणसाचे काय काम?
७
जगणे थांबत नाही
ते फक्त स्थलांतर करते
मला तुझे स्थलांतर दिसत नाहीये
तू थांबलायस ?
कि तू मेलायस हे तुला कळत नाहीये ?
८
तुझ्या जगण्याची आम्हाला लागलेली सवय तुटली
एवढाच अर्थ ?
९
गेली कित्येक दिवस
माझ्या दारातील आंब्याची दोन जुळी झाडे
पाने हलवत नाहीयेत
वारा मलूल झालाय कि वारा मरून गेलाय ?
मात्र दूरवरच्या towers वरून
नेटवर्क्स येतायत
त्यांची जगण्याची इच्छा
आंब्याच्या झाडापेक्षा तीव्र आहे का ?
१०
तू मेलेलाच नाहीस
फक्त एकांतात जाऊन बसलायस
''डोन्ट डिस्टर्ब ''
ही पाटी
तुझ्यासाठी आहे
कि आमच्यासाठी आहे ?
११
सगळेच आठवडे fashion वीक झाल्यावर
मी तुला कसे बघावे ?
जुने कपडे टाकून आत्मा नवे कपडे घेतो ?
तू फक्त fashion बदलण्यासाठी गेलायस कि काय ?
१२
देह एकच मिळतो --- अपरिहार्य
सावल्या अनेक ---अपरिहार्य
आपण दोघांनी कित्येक सावल्या
ग्रुम केल्या
त्या निखळतायत
१३
मी बांदिवड्यात येणार नाहीये
लोक विचारतायत
'' तू सनातनला घाबरतोयस कि काय ?''
मी सनातनला घाबरत नाहीये
फाट्यावर मारतोय
१४
मला आशा वहिनी दिसतीये
आणि दिसतही नाहीये
मला सुरेल दिसतोय
आणि दिसतही नाहीये
मला दिपाली दिसतीये
आणि दिसतही नाहीये
त्यांच्या दु : खांचे एक्सरेज
माझ्यात फोटो कॉपीज तयार करत नाहीयेत
दु : खांचा कायमचा अंत झालेल्या माझ्या शरीरात
तुझ्या नावाने
शून्याचे झेंडे फडफडतायत
१५
मृत्यूसंस्कार
दशक्रिया
हे सर्व फालतू आहे
मला ह्या सोशल ट्रान्झेकशनमध्ये भाग घ्यायचा नाहीये
जो गेला
तो येणार नाही
ही ग्राउंड नेट reality आहे
१६
मृत्यूला फेक करता येत नाही
म्हणूनच सर्व फेक्युलर त्याला घाबरतात
मृत्यूला फेक बनवण्याचे विधी
मी अटेंड करणार नाही
म्हणून मला माफ कर
तुझे जगणे अस्सल होते
माझ्या मेंदूत त्याच्या ओरीजनल कॉपीज
तहहयात राहोत
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment