ज्याची त्याची शैली / श्रीधर तिळवे -नाईक
अलीकडे काही लोक कवितेला गेयता /वृत्तछंदता/ लय /निदानपक्षी प्रतिमा हवी असे आडून आडून फारच सुचवायला लागलेत त्यात आमचे मित्रही आहेत तार्किक पातळीवर हे पटायला लागते पण प्रत्यक्षात असे होत नाही मी मात्रा वृत्तापासून सुरवात केलेला कवी आहे पण माझा अनुभव असा कि प्रत्येक अनुभव वा कल्पनानुभव स्वतःची एक मागणी एक दाब घेवून येतो कधी प्रतीमांचीच आवश्यकता भासते तर कधी गद्यप्राय ओळींची ! कथाकाव्य असेल तर गद्य ओळी येणे अटळ असते (फेसबुकवर मी लव शहर और टेरर हे महाकथाकाव्य टाकलंय त्यात अश्या ओळी आहेत कारण दहशतवादाचा डिसकोर्स आणि मी माझ्या प्रेयसी बरोबर ह्या बॉम्बस्फोटाच्या रात्री अडकल्याचा रोमांटिक भयग्रस्त अनुभव हे त्या रात्री माझ्या डोक्यात एकत्रच चाल्ल होत आता त्यातला डिसकोर्स वगळून शुद्ध कविता लिहणे शक्य होते पण ते त्या अनुभवाशी अप्रामाणिक झाले असते )छोट्या लयबद्ध ओळीतून विलास सारंग , मन्या ओक , मन्या जोशी , निवी कुलकर्णी ,ओंकार कुलकर्णी सारखे कवी पटकन स्पर्श करतात आणि एक सूक्ष्मता नोंदवतात आणि संगीतासारखे रेंगाळत राहतात काही छोट्या आणि दीर्घ ओळ्यांच्या दरम्यान लयबद्ध प्रतीमाशील ताना घेत दिलीप चित्रे नामदेव ढसाळ , विवेक मोहन राजापुरे , अरुण काळे , दिलीप धोंडो कुलकर्णी , सत्यपालसिंग राजपूत सारखे आतषबाजी करत अनुभवाचा गुलमोहर फुलवतात तर इंदिरा संत , मर्ढेकर , ग्रेस , मल्लिका , ज्ञानदा , चैताली , सौमित्र सारखे भावनांना प्रतिमा आणि लय ह्यांच्यात वागवत मेंदू ओला करून सोडतात . काही चंद्रकांत पाटील , सतीश काळसेकर , तुळशी परब , यशवंत मनोहर , भुजंग मेश्राम , महेंद्र भवरे , दासू वैद्य , वर्जेश सोलंकी , हेमंत दिवटे , संजीव खांडेकर , प्रणव सुखदेव , प्रवीण बांदेकर , वीरधवल परब ,दिनकर मनवर , नितीन वाघ , संदीप देशपांडे , मंगेश बनसोड , आल्हाद भावसार , लोकनाथ यशवंत , वैभव छायासारखे गद्यप्राय ओळीत कल्पनाविलास पेरत प्रतिमांना आणि प्रतीकांना सखोल न्हेत मनाचा वा समाजाचा आत जावून उत्खननप्रवण धांडोळा घेतात तर ना घ देशपांडे , बहिणाभाई चौधरी , भालचंद्र नेमाडे , संतोष पवार , प्रकाश होळकर , ना धो महानोरांसारखे लोकशैलीची कक्षा रुंदावत न्हेत मराठमोळी लयकारी अभिधा आणि व्यंजनात खेळवत वाचकाला जमिनीवर ठेवत अनुभव पतंगासारखा उडवत राहतात . पु शि रेगे , अरुण कोल्हटकर , सलिल वाघ ,नितीन अरुण कुलकर्णी सारखे मोजक्या शब्दांचे ढळढळीत शब्दशिल्प उभे करतात . चंद्रकांत खोत , अनिरुद्ध कुलकर्णी , निळकंठ महाजन , सचिन केतकर , मंगेश काळे प्रतिमांचे सररिअल फुलोरे फुलवत आख्या कवितेलाच प्रतिमांचे झाड करून टाकतात आणि मनमोहन , सदानंद रेगे , विंदा करंदीकर , श्रीधर तिळवे सारखे अनुभवानुसार कविता बदलत ठेवतात . प्रत्येकाची तऱ्हा आणि पिंड वेगळा . अनुभव घेण्याची तऱ्हा वेगळी आणि व्यक्त करण्याचीही !तेव्हा वृत्तछंद आणि लय ह्यांच्या आग्रहाला मर्यादा असलेली बरी आणि कविता गद्यप्रायतेलाही ओपन असलेली बरी !
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment